Prajaktach zaad
हल्लीच एका रुळलेल्या सामाजिक कार्यक्रमात एक प्राजक्ताचं झाड दिसलं, त्या झाडाची मुळही दिसली , घट्ट मातीत रुजलेली, आईला घट्ट चिटकून बसलेली मुलं असतात तशी. त्यांची भेट नाही झाली. भेट घ्यायची हिम्मत नाही झाली. कोणत्या तोंडाने भेटणार, काय काय बोलणार ? प्रश्न पडत होते. कार्यक्रमाची सांगता झाली, आवराआवर करत होतो. पण मनातून विषय दूर होत नव्हता. सत्यभामा-रुक्मिणी ची कहाणी डोक्यात घोळत होती. प्राजक्ताचं झाड कोणी लावलं, कोणासाठी लावलं आणि कोणाच्या पदरातली फुलं ते वेंचतंय? कोणत्या निर्माल्याच तुम्ही फुल करताय ?. सगळंच अतर्क्य आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं इतकं सोपं तत्वज्ञान सांगायला संत व्हावं लागत नाही. हेच सारखं जाणवत होतं. व्यवस्थेचे गोळे पचवत हे जग नक्की चाललंय कुठे . इतकं बेरकी का झालं आहे चांगुलपण. गाडगी मडकी घेऊन आयुष्य सत्कारणी लावणाऱ्या या संतांच्या जगात, ताव मारून, बोटं पुसत का चर्चिलं जातं शहाणपण ? डॉक्टर प्राजक्ता, डॉक्टर अभिजित माफ करा पण आम्ही माणसं नाही. माणसासारखी माणसं नाहीत. आमच्या असण्याला नोटेचा रंग आहे, पण घामाचा वास नाही. भोगण्याचा शाप नाही. तुम्हाला काल होता, तुम्हाला आज आहे आणि उद्याही असणारच. कारण तुमच्या इतिहासातच आम्ही आहोत. बेवारसात व्यावसायिक उभे करणारे तुम्ही माणूस आहात, आई, बाप, बहीण, भाऊ नसलेल्याचे तुम्ही गोत्र आहात, मृत्यू मागणाऱ्या आईचे तुम्ही देव आहात. तुम्ही मानव आहात , बस. आपल्या कार्यात माणसातला ईश्वर आपणास यश देवो व आपले हे कार्य या जन्मीच पूर्ण होऊन समाप्त होवो हि इच्छा. आपणास वंदन ....
Dedicated to Dr. Prajakta, Dr. Abhijit and Shailesh.
Comments
Post a Comment