ऑनलाईन बिनलाईन - जबाबदार आईबापासाठी
ऑनलाईन बिनलाईन : मुलं सध्या काय शिकत आहेत ?
Online हा शब्द आता अजिबात नवीन नाही. ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना देखील आता खूप सवयीची झाली आहे. खूप मोठ्या संकटातून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जगण्याचा, पुढे जाण्याचा प्रयत्न देखील करतो आहे, यशस्वी होतो आहे. आलेल्या संकटाने आपल्याला जगण्याची , धडपडण्याची उर्मी आपणा सर्वांना दिली. अनेक नाती नव्याने अनुभवण्याची मोलाची संधी दिली. अनुभवातून माणूस शिकतो हे अगदी तंतोतंत अनुभवायला मिळालं. Online world at large अनुभवताना small world around you तपासून बघता आलं. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून आबालवृद्ध शिकत होते, मन रमवत होते. नोकरी, शिक्षण, व्यवसाय सगळं कसं बदललं होतं, कात टाकत होतं. मोबाईल पासून मुलांना लांब ठेवा, योग्य अंतरावर ठेवा म्हणणारे आई बाप, पालक मोबाईल पासून मुलाना दूर जाऊ द्यायला तयार नव्हते. बदलत्या शिक्षणासमोर, पद्धतीसमोर पालक मुकाटपणे जमवून घेत होते. अर्थात प्रश्न पाल्याच्या भविष्याचा होता. आर्थिक हातघाईला आलेला सर्वसामान्य देखील तंत्रज्ञानाच्या अतिवापराबद्दल नाखूष पण मूग गिळून गप्प होता.
आता मोबाईल मुलांच्या आयुष्याचा भाग बनून राहिला आहे, किती दिवस हे काळच सांगू शकेल.पण कोणी हे सांगू शकेल की शालेय शिक्षणाबरोबर मुलं सध्या आणखीन काय शिकत आहेत ?, काय बघत आहेत ? कुठं चालली आहेत ? . माध्यम त्यांना नक्की कुठं घेऊन जात आहे ?
आपण कधी मोबाईल च्या पोटात, इतिहासात, memory मध्ये जाऊन बघितलं आहे की नक्की मुलं इतका वेळ कसला अभ्यास करत आहेत, कोणती माहिती मिळवत आहेत, कशाचं आकलन करत आहेत, आणि ते खरंच गरजेचं, अभ्यासाचं, उपयोगाचं आहे ? प्रोजेक्ट साठी, माहितीसाठी इंटरनेटवर नक्की काय शोधलं जात आहे ? याचा शालेय अभ्यास, क्लास, घरचा अभ्यास याचा काय संबंध आहे ? ऑफिस पुन्हा सुरू झाली असली तरी मुलं घरी बसून शाळेत हजर रहात आहेत . त्यांच्या कडे कोणाचं लक्ष आहे ? साधनं उपलब्ध करून देण्यापालिकडे पालक म्हणून, समाज म्हणून आपली काही कर्तव्य आहेत, ती आपण नीट पार पाडत आहोत का ?. शाळेचा उंबरा ओलांडून लवकरच पुढील शिक्षणाकडे वाटचाल करणाऱ्या मुलांना, तारुण्याकडे तोंड करून उभे असणाऱ्या पौगंडावस्थेतील मुलांकडे आपले लक्ष आहे का ? योग्य त्या वयात योग्य तीच माहिती, ज्ञान आपण मुलांना देतो आहोत का याची जबाबदारी शाळेबरोबरच पालकांची नाही का ? आपण शिक्षण व्यवस्थेचा आदर करतो आहोत, आहारी गेलों आहोत की बळी पडलो आहोत याचा विचार वेळेत करायला हवा.
दृकश्राव्य माध्यम आपल्याला अश्या काही विश्वात घेऊन जात आहे, की त्याची गरज व मर्यादा आपण आपली ओळखलेली बरी. एक पालक म्हणून आपल्या आसपासच्या तंत्रज्ञानाची history एकदा तपासून पहा. तशी सोय उपलब्ध आहे याची जाणीव करून घ्या. शिक्षण आणि ज्ञान योग्य आणि वेळेतमिळाले तर त्याचा सदउपयोग होतो.
थोडा वेळ काढून लक्ष द्या. ओसरीवरून घराचा अंदाज येतो म्हणतात. एक सुज्ञ आईबाप म्हणून विनंती आहे..बघा " मुलं सध्या काय करतात".
अतिशय ज्वलंत आणि ताज्या विषयावरचं तितकंच उत्कट लिखाण. तंत्रज्ञानाच्या या परिणामांचाही विचार प्रत्येक सुजाण पालकाला करावाच लागेल.
ReplyDeleteविषय, आशय व शैली या सर्वार्थाने उत्तम.
श्रीनिवास कुलकर्णी.
Thank you so much sir..
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete