देव...आनंद.

 व्यवसायाने संगीत, कला क्षेत्राशी निगडित असल्याने सतत नवनवीन कलाकारांशी संबंध येत असे. अशातच एका नवीन कार्यक्रमाची कल्पना डोक्यात घोळत होती. एक रंगमंचीय सांगीतिक सादरीकरण करायची इच्छा होती. विषय होता अर्थात 'देव आनंद'. बस, ठरवलं हाच विषय अभ्यास करून सादर करायचा. गायकांशी बोलणं झालं होतं पण लिखाण अजून सुरू केलं नव्हतं. शशांक शेंडे शी विषय बोललो, कात्रणं, किस्से, गाणी अश्या माहितीची जमवाजमव सुरू केली. बऱ्यापैकी जुळून देखील आलं. पण मनात एक इच्छा होती, प्रत्यक्ष त्यांना भेटायचं, गप्पा मारायच्या. पण कसं?. इतका मोठा कलाकार, स्टार भेटायचा म्हणजे मुश्किल काम. इच्छा अजूनच प्रबळ होत होती. बस...ठरवलं, मुंबई गाठायची. देव ला भेटायचं. प्रश्नावली तयार करत होतो.अश्यातच कोणी तरी सुचवलं, अंबरीश मिश्र, तुला खूप मदत करतील. देव चे फॅन तर आहेतच पण अभ्यास दांडगा आहे. अंबरीश मिश्र यांची मुलाखत पार पडली. तब्बल चार तास, गप्पा किस कहाण्या..आणि देव आनंद चा फोन नंबर मिळाला. पूर्ण तयारीने देव आनंद ला फोन करण्यात आला.

पहिलाच फोन, पलीकडून आवाज आला,"येस, देव स्पिकिंग" आणि मी बधिर झालो फोन देवालाच केला होता पण त्याचा आवाज ऐकून काहीच सुचेना.पटकन फोन खाली ठेवला. तो स्वतः फोन घेईल याचा अंदाज देखील नव्हता. माझी घाबरगुंडी बघून मित्र हसत होते. परत धीर करून फोन केला. परत तेच उत्तर. पण यावेळेस धीटपणे उत्तर दिलं. मी सागर, पुण्यावरून बोलतोय, भेटता येईल ?. मी काय बोलत होतो याचा मलाच पत्ता नव्हता. संभाषण संपलं. "धिरे धिरे चल" वगैरे काही नाही. पळत सुटलो, आनंद गगनात मावत नव्हता.एक तर देव बोलला आणि त्यात प्रत्यक्ष भेटण्याची वेळ मिळाली. 

या दिवशी प्रत्यक्ष भेट झाली, गप्पा झाल्या. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सबंध दिवस महाबळेश्वर मध्ये एकत्र होतो. कार्यक्रमाला येण्याची कबुली देखील मिळाली. कोणी एक लेखिकेने त्याच्यावर एक पुस्तक लिहिल होत आणि देव ला दिलं होतं. बोलता बोलता देव साहेब म्हणाले, 'हम दोनो' कलर करतोय. तुला एक गाणं देतो. असं म्हणून त्याने एक सीडी भेट दिली आणि त्या लेखिकेचे पुस्तक दिलं. सीडी मध्ये " अभी न जाओ" कलर व्हर्जन होतं. माझ्या तयारीची ची एक सीडी मी त्यांना देऊ केली. त्यांनी ती प्रेमाने नाकारली. देव या वयातही गाडीत कॅसेट ऐकत असे.

 'चार्ज शीट' पूर्ण झाला होता. तो पुढच्या तयारीला देखील लागला होता. कुठून येतो या वयात हा उत्साह. फ्रेडरिक च्या रस्त्यावर देव सोबत ची संध्याकाळ आयुष्यातील सर्वात गोड संध्याकाळ होती. 

दिवस जात होते. एके दिवशी प्रेम, देव चा ड्रायव्हरचा फोन आला. देव सहाब बात करना चाहते है. " हाय सागर, मै कुछ दिनो के लिये बाहर जा रहा हू, कुछ काम है तो ये मेरा नंबर लिख लो. देव ने एक भला मोठा नंबर दिला,  बहुदा लंडन चा होता तो नंबर. नियतीने तो नंबर अजून डायल करू दिला नाहीये. 

देव बहुदा शूटिंग मध्ये बिझी असेल, उगाच त्रास नको कामात म्हणून नाही करत फोन. 

देव ने मला सिनेमा वितरक होण्याची ऑफर दिली होती. काम करायला हवं असं तो फ्रेडरिक पाशी फिरताना सारखं बोलत होता.

मला आवडेल ते काम करायला असं म्हणालो असतो तर बरं झालं असतं. त्याच्या चाहत्यांनी तर नक्की बघितले असते सिनेमे. खूप आठवणी आहेत, खूप सुंदर क्षण आहेत बोलायचे. फोन नंबर देखील आहे माझ्याकडे अजून. 

तो जरा फ्री असल्याचं बघून करेन मी फोन...

फोन घेऊन तो म्हणेल सुध्दा , "येस देव स्पिकिंग"..या वेळेस मात्र मी फोन ठेवणार नाही घाबरून...



सागर अत्रे, पुणे

9158867111

Comments

Popular posts from this blog

एक गुणी संगीतकार - आनंद मोडक.